Thursday 6 February 2014

राष्ट्रपिता ही पदवी सरोजिनी नायडूंची देण!

लोकमतच्या रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजीच्या
अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण. 
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही बिरुदावली कोणी लावली, हा प्रश्न सध्या देशभरात गाजतो आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ठोस लिखित पुरावा भारत सरकारकडे उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. तथापि, त्या काळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्या तसेच ‘भारत कोकिळा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींना उद्देशून राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला आहे.

लखनौ येथील इयात्ता सहावीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पराशर हिने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात एक याचिका दाखल करून ‘गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली' अशी माहिती विचारली होती. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाकने गृहमंत्रालयाकडे पाठविली. नंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आली. तथापि, या सर्व प्रवासात राष्टड्ढपिता ही बिरुदावली गांधीजींना कोणी लावली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आमच्याकडील कागदपत्रांद्वारे तुम्हीच संशोधन करा, असे पत्र पुरातत्व विभागाने ऐश्वर्याला पाठविले. शेवटी तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना ही बिरुदावली पहिल्यांदा लावली, असा प्रवाद आहे. या बिरुदावलीचे श्रेय कोणी सुभाषचंद्र बोस यांनाही देतात. तथापि, यासबंधीचा ठोस लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नाही.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सदर प्रतिनिधीने राज्यातील जुन्या जाणत्या लोकांकडे विचारणा केली, तेव्हा सरोजिनी नायडू यांचे नाव समोर आले. तथापि, त्यासाठी ठोस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. जुन्या पुस्तकांत काही उल्लेख सापडू शकतात, हे गृहीत धरून प्रतिनिधीने औरंगाबादेतील फुटपाथवर जुनी पुस्तके विकणा-या लोकांकडे धांडोळा घेतला. तेव्हा, अद्भूत योगायोग जुळून आला आणि प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या ‘रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' पुस्तकाच्या मराठी अनुवादाची एक जीर्ण प्रत हाती लागली. महात्मा गांधी यांना सरोजिनी नायडू यांनी राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. प्रतिनिधीच्या हाती आलेल्या या पुस्तकाची सुरूवातीची आणि शेवटची काही पाने गायब आहेत. त्यामुळे त्याचा प्रकाशक कोण हे कळू शकलेले नाही.


२८ मार्च १९४७ रोजी मिळाले राष्ट्रपिता संबोधन
गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन कसे प्राप्त झाले, याची माहिती असलेला पुस्तकातील तपशील असा : ब-याच लोकांची अशी कल्पना आहे की, गांधीजींना ‘राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम नेहंनी लावली. ते बरोबर नाही. श्रीमती सरोजिनी नायडूंनी हा शब्दप्रयोग प्रथम आमलात आणला. त्यावेळचा प्रसंग असा : २८ मार्च ते २ एप्रिल १९४७ या काळात नवी दिल्लीत आशियायी परिषद भरली होती. श्रीमती नायडू परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गांधीजी झपझप पावले टाकीत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना श्रीमती सरोजिनी नायडूंनी आपल्या पल्लेदार स्वरात त्यांचे आगमन घोषित करताना गांधींचा उल्लेख ‘आमचे राष्ट्रपिता' या शब्दांत केला.

अजोड भक्ती 
सरोजिनी नायडू यांची महात्मा गांधींवरील भक्ती किती अजोड होती, याचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. मथाई यांनी लिहिले आहे : शोकसागरात बुडालेल्या काँग्रेसजनांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, ‘‘अरे बाबांनो, महात्म्याला शोभेल असेच मरण बापूंना आले आहे. वृद्ध होऊन, अपचनासारख्या विकाराने त्यांना मृत्यू यायला हवा होता की काय?'

नेहरुंचा गांधीजींविषयीचा पितृभाव
नेहंनाही महात्मा गांधी यांच्याबद्दल पित्यासमान भक्ती होती. नेहंच्या या भावनेला मथाई ‘फादर कॉम्प्लेक्सङ्क असे नाव देतात. महात्मा गांधी यांच्याजवळ नेहरू आपले मन पूर्णतः रिकामे करीत. एखाद्या लहान मुलाने आपल्या पित्याला आपली सर्व रहस्ये सांगावी, अशी ही भावना होती. शुक्रवार दि. ३० जानेवारी १९५८ रोजी सायंकाळी ५.१७ वा. गांधीजींजी हत्या झाली. नेहरू सैरभैर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या भावना इतक्या अस्सल आणि उत्कट होत्या की, कोणतीही पूर्व तयारी न करता, नेहंनी आकाशवाणीवरून त्या दिवशी राष्टड्ढाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणाचे पहिले वाक्य होते : ‘द लाईट हॅज गॉन आऊट ऑफ अवर लाईफ...' नेहरुंचे हे भाषण याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नेहरू यांचे निवासस्थान १७, यॉर्क रोड हे होते. नेहरुंच्या निवासस्थानातील चूल त्या संध्याकाळी पेटली नाही. नेहरूंपासून नोकरापर्यंत कोणीही त्या रात्री जेवले नाही, अशी माहिती मथाई देतात.

एम. ओ. मथाई यांच्या 'रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज'
या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या छायाचित्रात 
नेहरूंसोबत मथाई (उभे असलेले) दिसत आहेत.
कोण होते मथाई?
दक्षिण भारतातून आलेले एम ओ मथाई स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ‘युनायटेड स्टेट्स आर्मीङ्कच्या सेवेत होते. १९४६ साली ते युएस आर्मीचा राजीनामा देऊन नेहंचे स्वीय सहायक म्हणून सेवेत रूजू झाले. ते २४ तास नेहंसोबत असत. नेहंच्या प्रत्येक निर्णयाचे ते साक्षीदार होते, असे मानले जाते. कालांतराने त्यांच्यावर ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्रङ्क बनल्याचे आरोप झाले. कम्युनिस्टांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे १९५९ साली त्यांनी नेहंच्या स्वीय सहायक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य चेन्नईत घालवले. १९८१ साली वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले. मथाई यांनी नेहंशी संबंधित दोन पुस्तके लिहिली. १. रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज (१९७८) २. माय डेज विथ नेहरू (१९७८). मात्र ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली. त्यात त्यांनी अनेक स्फोटक गोष्टी लिहिल्या होत्या. विशेषतः त्यांचे पहिले पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी घातली.

- सूर्यकांत पळसकर

2 comments:

  1. सूर्यकांतराव, नमस्कार. या लेखातली माहीती चांगली आहे. लेख बहुतांश आवडला. फक्त एक उल्लेख खटकला. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी म्हणून नथुराम गोडश्यांचे नाव आले आहे. त्याऐवजी मोहनदास गांधी हे नाव हवे होते. कारण भारतावर सैनिकी आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत म्हणून गांधी उपासास बसले होते. आपल्या अतिरेकी वर्तनाने आक्रमक शत्रूला मदत करणारा माणूस अतिरेकीच समजला पाहिजे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. गामा पैलवान भाऊ, गांधीजी उपोषणास बसले म्हणून काय बिघडले. उपोषण केले म्हणून कोणी अतिरेकी होते का? आणि उपोषण केल्याने कोणी अतिरेकी होतच असेल, तर विनायक दामोदर सावरकर यांना सगळ्यात मोठा अतिरेकी म्हणावे लागेल. कारण त्यांनी आठ दिवसांचे उपोषण करून स्वत:चे जीवनच संपविले होते. आता बोला, सावरकर हे सगळ्यात मोठे अतिरेकी होते, असे म्हणायचे का?

      Delete